पुणे : रेनबो हार्ट फाउंडेशनच्या वतीने महात्मा गांधी विद्यालय, उरुळी कांचन येथे आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत पंचक्रोशीतील चिमुकले विद्यार्थी रंग, रेषा आणि कल्पनाशक्तीत पूर्णतः तल्लीन झाले होते. या स्पर्धेला तब्बल ५०० हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेचा शुभारंभ विद्यालयाचे प्राचार्य भोसले सर, उपप्राचार्य काशीद सर, विभागप्रमुख शिर्के मॅडम, जगताप सर, प्रा. सायकर सर, खाडीलकर मॅडम व मणियार सर यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमांतर्गत केवळ चित्रकला स्पर्धाच नव्हे तर विद्यार्थ्यांना योग्य दिशा, जीवनातील ध्येय, एकाग्रता व मानसिक शांततेसाठी मार्गदर्शन आणि ध्यान सत्राचेही आयोजन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह व सकारात्मक ऊर्जा दिसून आली.
या स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयासह सायरस पुनावाला स्कूल, एंजल हायस्कूल, स्वामी विवेकानंद विद्यालय, स्वामी अकॅडमी, अस्मिता प्राथमिक विद्यालय, पुरोगामी विद्यालय तसेच हडपसर, माळवाडी, मांजरी, लोणी, मगरपट्टा आदी भागांतील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांच्या चित्रांमधून “आपली कला–आपली संस्कृती” याचे सुंदर दर्शन घडले. स्पर्धेतील उत्कृष्ट कलागुण सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांतून तीन क्रमांकांची निवड करण्यात आली. प्रथम पारितोषिक १० हजार रुपये, मेडल, प्रमाणपत्र व ड्रॉइंग किट; द्वितीय पारितोषिक ६ हजार रुपये तर तृतीय पारितोषिक ४ हजार रुपये देण्यात आले.

बक्षीस वितरण महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त श्री. राजाराम (दादा) कांचन, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त श्री. विनोद (काका) कांचन, ह.भ.प. अक्षय महाराज रोडे व मान्यवरांच्या हस्ते झाले.
स्पर्धेचे पंच म्हणून के. व्ही. आर्ट अकॅडमीच्या प्रमुख सौ. कल्पना वीरकर, श्री. सागर वीरकर व त्यांच्या टीमने मोलाचे योगदान दिले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन रेनबो हार्ट फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून कार्यक्रम प्रमुख म्हणून आदेश विनोद कांचन उपस्थित होते. भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
