पुणे : पुणे जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजताच हवेली तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून लोणी काळभोर–कदमवाकवस्ती परिसरात वातावरण तापू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर नवपरिवर्तन फाउंडेशनच्या वतीने लोणी काळभोर–कदमवाकवस्ती जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गणांसाठी इच्छुक उमेदवारांचा भव्य मेळावा कदमवाकवस्ती येथील मनाली रिसॉर्टमध्ये पार पडला.

या मेळाव्याचे अध्यक्षस्थान कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गणपतराव काळभोर यांनी भूषविले. नवपरिवर्तन फाउंडेशनच्या कोर कमिटी सदस्यांची प्रमुख उपस्थिती लाभली. लोणी काळभोर–कदमवाकवस्ती–वडकी जिल्हा परिषद गटासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाले असून लोणी काळभोर पंचायत समिती गणासाठी इतर मागासवर्गीय महिला, तर कदमवाकवस्ती पंचायत समिती गणासाठी अनुसूचित जाती आरक्षण घोषित करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर इच्छुकांची संख्या लक्षणीय असल्याचे चित्र या मेळाव्यात पाहायला मिळाले.
लोणी काळभोर–कदमवाकवस्ती जिल्हा परिषद गटासाठी सोनम नामुगडे, पूनम गायकवाड, पूजा काळभोर यांनी नवपरिवर्तन पॅनलमधून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली.
तर लोणी काळभोर–वडकी पंचायत समिती गणासाठी उज्वला महेश फलटणकर, दिपाली घाडगे , तर कदमवाकवस्ती पंचायत समिती गणासाठी ज्ञानेश्वर नामुगडे , राकेश लोंढे, नकुल शिंदे, भगवान साळवे यांनी उमेदवारीसाठी पुढाकार घेतला.

मेळाव्यात उपस्थित नागरिकांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत सांगितले की, येणाऱ्या निवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवारांनी पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, अंतर्गत रस्ते, मागासवर्गीय नागरिकांची घरे नियमित करणे, तसेच कदमवाकवस्ती शिवरस्ता पूर्ण करणे या प्रश्नांना प्राधान्य द्यावे.

या मेळाव्यास माजी सरपंच चित्तरंजन काळभोर, गौरी गायकवाड, उपसरपंच नासिरखान पठाण, गुरुदेव जाधव, अशोक कदम, मुकुंद काळभोर, सूर्यनारायण काळभोर, माऊली काळभोर, प्रताप कदम, उदय काळभोर, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत सदस्य व सदस्या, तंटामुक्ती अध्यक्ष अभिजित बडदे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व मान्यवर उपस्थित होते.

या मेळाव्यामुळे लोणी काळभोर–कदमवाकवस्ती गटात नवपरिवर्तन फाउंडेशनने निवडणुकीपूर्वीच ताकद दाखवत राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत दिले आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *