पुणे : आध्यात्मिकतेतून मानवी एकता दृढ होते आणि परस्पर प्रेम व सौहार्द वाढीस लागते, या भावनेतून संत निरंकारी मिशनच्या सामाजिक शाखा संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनतर्फे पुणे झोनमधील कोथरूड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज व निरंकारी राजपिता जी यांच्या आशीर्वादाने रविवार, १४ डिसेंबर २०२५ रोजी हे शिबिर पार पडले.

या शिबिरात मिशनचे अनुयायी तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित एकूण २१४ युनिट रक्तसंकलन केले. यामध्ये संत निरंकारी रक्तपेढीने १२३ युनिट, तर ससून रुग्णालयाच्या रक्तपेढीने ९१ युनिट रक्तसंकलन करून मोलाचे योगदान दिले. शिबिराचे उद्घाटन कोथरूड शाखा प्रमुख श्री. सुधीर वरघडे यांच्या हस्ते झाले.

संत निरंकारी मिशनचे बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी दिलेला ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’ हा मानवतेचा संदेश मिशनचे अनुयायी प्रत्यक्ष कृतीतून साकारत आहेत. सद्यस्थितीत सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम निरंतर पुढे नेला जात आहे.

कोथरूड परिसरात संत निरंकारी मिशनतर्फे मानवकल्याणासाठी वेळोवेळी विविध जनसेवेचे उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, मोफत आरोग्य तपासणी, नेत्र चिकित्सा शिबिरे, महिला सशक्तीकरण, बालविकास तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतकार्य यांचा समावेश आहे. या सामाजिक कार्याची दखल घेत भारत सरकार व राज्य सरकारांनी मिशनला वेळोवेळी सन्मानित केले आहे.

रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संत निरंकारी सेवादल व मिशनच्या अनुयायांचे विशेष योगदान लाभले. रक्तदानाबाबत जनजागृती करण्यासाठी कोथरूड परिसरात घरोघरी जाऊन संदेश पोहोचविण्यात आला. शिबिरास उपस्थित सर्व रक्तदाते व मान्यवरांचे आभार भरत इंगुळकर (सेवादल इन्चार्ज) यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *