पुणे : शेतात राबणारा बळीराजा अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. दैनंदिन मेहनत, कामाचा ताण आणि वेळेअभावी आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात घेऊन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन जयप्रकाश चौधरी यांच्या संकल्पनेतून आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती व लक्ष्य फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने “ एक पाऊल बळीराजाच्या आरोग्यासाठी ” या उपक्रमांतर्गत भव्य बळीराजा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे आरोग्य शिबिर शनिवार, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शांताई मंगल कार्यालय, अल्ट्राटेक कंपनी रोड, थेऊरकर मळा, सोरतापवाडी येथे होणार आहे. या शिबिरामध्ये शेतकरी व नागरिकांसाठी विविध आजारांवरील तपासणी व उपचार सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शिबिरात नेत्ररोग व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया, कर्करोग तपासणी, मेंदू व मणक्यांचे विकार, अस्थिरोग व गुडघा प्रत्यारोपण, स्त्रीरोग व बालरोग तपासणी, मूत्ररोग, कान-नाक-घसा, दंतरोग तसेच पोटविकार तपासणी या सेवा उपलब्ध असणार आहेत.

याशिवाय मोफत डायलेसिस, मोफत एक्स-रे, मॅमोग्राफी तसेच गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे.
शेतकरी व नागरिकांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या या विशेष आरोग्य उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा, असे आवाहन सुदर्शन जयप्रकाश चौधरी यांनी केले आहे.
नोंदणीसाठी नागरिकांनी ८२६५०८६९३६, ९६६५३०२१६१, ९६५७४०४०४० किंवा ७७०९०८७०७६ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.
