पुणे : “एक गाव एक शिवजयंती” या संकल्पनेतून आयोजित अखिल श्रीक्षेत्र थेऊर शिवजयंती महोत्सव २०२६ (वर्ष ५ वे) मोठ्या उत्साहात व शिवमय वातावरणात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिवशाही सोहळ्यासाठी गावातील शिवशंभू भक्त, माता-भगिनी तसेच लहान-थोर मावळ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

श्रीक्षेत्र तुळापूर येथून आणलेली शिवज्योत सकाळी श्री चिंतामणी मंदिरात दाखल झाली. त्यानंतर कार्यक्रमस्थळी शिवज्योत स्थापित करून माजी सैनिकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करण्यात आली आणि शिवजयंती सोहळ्याला सुरुवात झाली.

यानंतर भव्य शिवशाही मिरवणुकीला प्रारंभ झाला. श्रीक्षेत्र थेऊरमधील पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या नवनाथ ढोल पथक, बेल्हेश्वर ढोल पथक आणि अष्टविनायक ढोल पथक यांच्या दमदार ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक रंगली.
ढोल-ताशांच्या तालावर शिवभक्तांनी जल्लोषात सहभाग घेतला.
मिरवणूक कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्व. श्री अजितदादा पवार यांना श्रीक्षेत्र थेऊरच्या नागरिकांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर पंढरपूर येथील लेझीम पथकाने आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच पंढरपूरवरून आलेल्या मावळ्यांनी शिवकालीन मर्दानी खेळांच्या चित्तथरारक कसरती सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमाला अधिक रंगत आणण्यासाठी श्रीक्षेत्र थेऊरमधील अंबिका जग्वार साऊंड सिस्टम तसेच व्ही. जे. अण्णा यांच्या लेझर लाईट शोची आकर्षक मांडणी करण्यात आली होती. डीजेच्या तालावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व शिवभक्तांनी जल्लोषात ठेका धरला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी श्रीक्षेत्र थेऊर पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. आनंदमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
श्रीक्षेत्र थेऊरमधील सर्व वर्गणीदार, शिवशंभू भक्त आणि संयोजकांच्या सहकार्यामुळे शिवजयंतीचा हा शिवशाही सोहळा अत्यंत दिमाखदार आणि शिवमय वातावरणात पार पडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.