पुणे : राज्य निवडणूक आयुक्तांनी महापालिका निवडणुकीची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांतच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती तुटल्याची अधिकृत घोषणा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

फडणवीस यांनी सांगितलं की, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असून दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, एकीकडे राष्ट्रवादीसोबत युती तुटली असली तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत भाजपची युती पुण्यात कायम राहणार असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं.

गेल्या पाच वर्षांपासून पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असून राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात आहे. पुण्यात दोन्ही पक्षांची मोठी ताकद असल्याने ही लढत चुरशीची होणार हे निश्चित मानलं जात आहे. पुण्यात महायुती होणार नसली तरी राज्यातील इतर महापालिकांमध्ये शक्य तिथे महायुती करण्याचा प्रयत्न राहील, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. काही ठिकाणी भाजप-शिवसेना तर काही ठिकाणी भाजप-राष्ट्रवादी अशी युती पाहायला मिळेल, आणि या लढती मैत्रिपूर्ण असतील, असंही त्यांनी नमूद केलं.

महायुती सरकार राज्यात चांगलं काम करत असून त्या कामाचा कौल शहरातील नागरिक आम्हालाच देतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. पुणे महापालिकेत भाजपने केलेल्या विकासकामांमुळे पुणेकर भाजपलाच पुन्हा संधी देतील, असंही ते म्हणाले. भाजपमध्ये प्रवेशासाठी अनेक नेते इच्छुक असले तरी कोणाला घ्यायचं याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक नेतृत्व घेईल, असं सांगतानाच शिंदे गट आणि भाजप एकमेकांचे नेते घेणार नाहीत, याची त्यांनी पुन्हा एकदा पुनरुक्ती केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *