पुणे: चारचाकी वाहनासाठी हुंड्याची मागणी, वारंवार पैशांचा तगादा, मानसिक छळ तसेच जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्यामुळे विवाहितेने आत्महत्या केल्याची गंभीर घटना उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोरतापवाडी परिसरात उघडकीस आली आहे. दिप्ती रोहन चौधरी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
या प्रकरणी पतीसह सासू, सासरे व दीर अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौ. हेमलता बाळासाहेब मगर (वय ५०, व्यवसाय – गृहिणी, रा. आकेशिया गार्डन, मगरपट्टा सिटी, हडपसर) यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिप्ती हिचा विवाह रोहन कारभारी चौधरी याच्याशी झाला होता.
२५ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून २४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत, सोरतापवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथील दिप्तीच्या राहत्या घरी तिचा पती रोहन कारभारी चौधरी, सासू सुनिता कारभारी चौधरी, सासरे कारभारी चौधरी व दीर रोहित कारभारी चौधरी यांनी चारचाकी वाहनासाठी माहेरून हुंड्याची मागणी केली. वेळोवेळी पैशांची मागणी करून पैसे घेतल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.
तसेच, दिप्ती हिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले असून टोचून बोलणे व मानसिक छळ केल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
सततच्या त्रासाला कंटाळून दिप्ती हिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येस वरील चारही आरोपी कारणीभूत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २२/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ८०, १०८, ८५, ८९, ३५२, ३५१(३), ११५(२) व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांनी घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई पोलिस उपनिरीक्षक प्रविण कांबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे करीत आहेत.