पुणे : वकिलांना येणाऱ्या अडचणी सोडविणे तसेच त्यांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने “ अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ॲडव्होकेट बार असोसिएशन, पिंपरी-चिंचवड” या नव्या वकील संघटनेची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सचिन पानी यांनी दिली. ही संघटना सर्व वकिलांसाठी कार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

पिंपरी येथील मोरवाडी न्यायालयातील बार रूममध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. अरुण खरात होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. राकेश अकोले, बी. के. कांबळे, प्रकाश निनाळे, रमेश गालफाडे, केशव घोगरे, प्रमिला गाडे आदी ज्येष्ठ वकील उपस्थित होते.
यावेळी महिला सहसचिवपदी ॲड. संगीता कुशालकर, सहसचिवपदी ॲड. संजय माने, सहायक सहसचिवपदी ॲड. सुनील डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रसिद्धी प्रमुख म्हणून ॲड. तेजस सरतापे यांना विशेष नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष ॲड. सुनील माने, सचिव ॲड. तेजस चवरे, महिला सचिव ॲड. आरती अकोले, सहसचिव ॲड. प्रशांत बचुटे, महिला सहसचिव ॲड. स्नेहा कांबळे, हिशोबनीस ॲड. ऋषिकेश शिनगारे, खजिनदार ॲड. अशोक बडेकर यांचा समावेश आहे. तसेच सदस्य म्हणून ॲड. नागनाथ सूर्यवंशी, मनोहर सोनवणे, संघर्ष सूर्यवंशी, अविनाश कांबळे, सागर पोवार, महेश जानकर, ओंकार नाणेकर, पल्लवी कुराडे, चांगुणा काकडे आदींची निवड करण्यात आली. सर्वांना प्रमुख अतिथींच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
नवीन संघटना स्थापन करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना ॲड. समीर चव्हाण यांनी बार आणि बेंच यांच्यात सुसंवाद व सुसंबंध प्रस्थापित करण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याचे सांगितले.
ॲड. अरुण खरात यांनी नव्या कार्यकारिणीस पाठिंबा व्यक्त केला. तसेच ॲड. पी. एस. कांबळे व ॲड. सुनील कडूसकर यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. तेजस चवरे व ॲड. प्रशांत बचुटे यांनी केले.