पुणे : यंदाच्या येणाऱ्या शिवजयंतीचे औचित्य साधून सुभद्रा सामाजिक सेवा संस्था व आर. के. सय्यद सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त माध्यमातून परिसरातील गरजू व दुर्लक्षित नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रमांची सुरुवात करण्यात येत आहे. समाजातील अंध, अपंग, निराधार, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता तसेच दुर्धर आजारग्रस्त नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.

या सामाजिक संस्थेमार्फत परितक्त्या व अपंग व्यक्तींच्या पेन्शनविषयक कामकाजासह अपंगांचे दाखले काढून देणे, रेशन कार्डशी संबंधित सर्व कामे, शासनाकडील विविध कागदपत्रांची पूर्तता, मंडळाची प्रशासकीय कामे, वस्तीतील सामाजिक प्रश्नांचे निराकरण तसेच पुणे महानगरपालिकेशी संबंधित कामे करण्यात येणार आहेत.

विशेषतः संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना या योजनांसाठी आवश्यक मार्गदर्शन व अर्ज प्रक्रिया मोफत राबविण्यात येणार आहे. यासाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, दोन फोटो, दारिद्र्यरेषेचे बीपीएल प्रमाणपत्र किंवा तहसीलदारांचे २१ हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न प्रमाणपत्र, जिल्हा किंवा तालुका ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचे वयाचे प्रमाणपत्र तसेच जन्माने मोठ्या मुलाचे आधार कार्ड (मुलाचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्यास) ही कागदपत्रे आवश्यक असतील.

विधवा महिलांसाठी पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, दिव्यांगांसाठी किमान ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, परित्यक्ता महिलांसाठी कोर्टाचा पुरावा किंवा पोलीस पाटील व ग्रामसेवकांचा संयुक्त अहवाल, तर टीबी, कॅन्सर, एड्स यांसारख्या दुर्धर आजारग्रस्तांसाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे.

परिसरातील गरजू नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी या उपक्रमाची माहिती संबंधित व्यक्तींना द्यावी व संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने खलीलभाई शेख (मो. ९६०४५६३४३८) यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *