पुणे : केसनंद वाडेबोल्हाई गणातील पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार आणि युवकांचे स्फूर्तीस्थान, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक युवा कार्यकर्ते कुशालनाना गोरख सातव यांच्या शिरसवडी (ता. हवेली) येथील गावभेट दौऱ्यानिमित्त ग्रामस्थांनी अभूतपूर्व आणि भव्य स्वागत केले. काठी-घोंगडी देऊन, घोडागाडीतून काढण्यात आलेली मिरवणूक, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी, पुष्पवृष्टी आणि जेसीबीच्या माध्यमातून घालण्यात आलेले भव्य पुष्पहार यामुळे संपूर्ण परिसर जल्लोषात न्हाऊन निघाला.
शिरसवडी येथे आगमन होताच कुशालनाना सातव यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्या भगव्या वादळाचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी गावातील माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध सोसायट्यांचे सभासद, शेकडो समर्थक, असंख्य तरुण कार्यकर्ते आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
येथील जागृत देवस्थान काळभैरवनाथाच्या साक्षीने ग्रामस्थांनी सर्व गटतट विसरून कुशालनाना सातव यांना निष्ठेने साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला.
रविवारी (ता. २१) शिरसवडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना कुशाल सातव म्हणाले, “ आपले एवढे प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. महापुरुषांच्या विचारांवर उभा राहिलेला महाराष्ट्र अन्याय सहन करत नाही. माझ्या विचारांना मिळणारा प्रतिसाद म्हणजेच माझा खरा विजय आहे. भविष्यात संधी मिळाल्यास पदाचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठीच करेन.”
या दौऱ्यामुळे केसनंद वाडेबोल्हाई गणात कुशालनाना सातव यांच्या नेतृत्वाला वाढता पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट झाले असून, आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा ठरत आहे.
