पुणे : कुंजीरवाडी येथील प्रभावती धुमाळ या सकाळी नेहमीप्रमाणे पायी चालण्यासाठी बाहेर पडल्या असता त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र नकळत गळ्यातून निसटून रस्त्यावर पडले. घरी परतल्यानंतर ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध सुरू केली.

दरम्यान, मंगळसूत्र शोधत असताना धुमाळ कुटुंबीयांना रस्त्यावरून जाणाऱ्या काही शाळकरी मुली भेटल्या. त्यातील कु. रुद्रा धुमाळ हिने मंगळसूत्र सापडल्याचे सांगत ते प्रामाणिकपणे परत केले. विशेष म्हणजे, तिला देऊ केलेल्या खाऊच्या पैशांचा स्वीकार करण्यासही तिने नम्रपणे नकार दिला. तिच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

कु. रुद्रा हिच्या या स्तुत्य कृतीची दखल घेत धुमाळ कुटुंबीय व स्व. विलास बापु तुपे फाऊंडेशन यांच्या वतीने ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालयाशी संपर्क साधून शाळेत छोटेखानी सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कु. रुद्रा हिचा सत्कार करण्यात आला. तसेच तिचे वर्गशिक्षक व शाळेच्या मुख्याध्यापिकांचाही गौरव करण्यात आला. उपस्थितांनी रुद्रा हिच्या प्रामाणिकपणासह तिच्या घरातील व शाळेतील संस्कारक्षम वातावरणाचे विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमास प्रभावती धुमाळ यांचे कुटुंबीय, कु. रुद्रा धुमाळ हिचे कुटुंबीय, युवा नेते नयन दादा तुपे, शाळेचे सचिव गोरख भाऊ घुले, कुंजीरवाडी गावचे सरपंच हरेश गोठे, मुख्याध्यापिका सुवर्णा सावंत, कार्यालयीन अधीक्षक सुखदेव कंद, तसेच माऊली सावंत, मुकेश गायकवाड, विशाल वायकर, भाऊसाहेब जगताप, सागरशेठ तुपे, स्वप्नील कुंजीर, बापू धुमाळ, शिक्षकवृंद आणि पर्यावरण संरक्षण समिती व स्व. विलास बापु तुपे फाऊंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते विकास धुमाळ यांच्या संकल्पनेतून ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालय, पर्यावरण संरक्षण समिती, कुंजीरवाडी व स्व. विलास बापु तुपे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या प्रांगणात १५ फूट उंचीची गावठी सोनचाफ्याची दोन झाडे लावण्यात आली. कु. रुद्रा हिच्या प्रामाणिकपणाचा आदर्श इतर विद्यार्थ्यांसमोर राहावा आणि प्रामाणिकपणाचे मूल्य कायम रुजावे, या उद्देशाने या झाडांचे नामकरण ‘प्रामाणिकपणाचे झाड’ असे करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *