पुणे : उरुळी कांचन परिसरात बेकायदेशीर सावकारी, मारहाण, अपहरण आणि बंदुकीचा धाक दाखवून जमीन नावावर करून घेण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरातील वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
तक्रारदार महादेव विठ्ठल जरांडे (वय ३६, व्यवसाय – जुने चारचाकी वाहन खरेदी-विक्री) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी आनंता पवार व माऊली पवार यांनी व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवत मोठ्या रकमा दिल्या. मात्र, त्यावर दरमहा ८ ते १० टक्के इतक्या अवाजवी व्याजदराने वसुली करण्यात आली. एकूण ५३ लाख ८९ हजार रुपयांचे मुद्दल घेतल्यानंतर अवघ्या ११ महिन्यांत तब्बल ६० लाख ४१ हजार रुपये व्याज वसूल केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

व्याज न भरल्यास दबाव टाकत विक्रीसाठी ठेवलेल्या १२ जुन्या चारचाकी गाड्या जबरदस्तीने ओढून नेण्यात आल्या. डिसेंबर २०२५ मध्ये आरोपींनी तक्रारदारास मारहाण करून जबरदस्तीने कुंजीरवाडी येथे नेले. तेथे बंदुकीचा धाक दाखवत कोरेगाव मूळ येथील ३ गुंठे जमीन साठेखत व कायमस्वरूपी कुलमुखत्यारपत्राद्वारे आरोपींच्या नातेवाईकाच्या नावावर करून घेतल्याचा आरोप आहे. या व्यवहारात प्रत्यक्षात कोणताही धनादेश देण्यात आलेला नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

सततच्या मानसिक, आर्थिक आणि शारीरिक छळामुळे तक्रारदाराने २६ जानेवारी २०२६ रोजी विषारी औषध प्राशन केल्याचा गंभीर प्रकार घडला. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, शुद्धीत दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी २९ डिसेंबर २०२५ रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड यांच्याकडे तक्रार अर्ज देण्यात आला होता. वेळेत कारवाई झाली असती तर ही घटना टळली असती, अशी खंत तक्रारदाराच्या पत्नीने व्यक्त केली.
दरम्यान, उरुळी कांचन परिसरात अपहरण, बेकायदेशीर सावकारी, अवैध धंदे, खून व चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये असून, पोलिसांचा वचक कमी झाल्याचा आरोपही होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उरुळी कांचन पोलिस करत आहेत.