पुणे : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर यांच्याअंतर्गत कार्यरत पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व कन्या प्रशाला, लोणी काळभोर यांच्या संयुक्त विद्यमाने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात सुरक्षा सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र पोलिस वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिस आयुक्तालय, परिमंडळ ६ अंतर्गत लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यातील प्रत्यक्ष कामकाज, विविध विभागांची रचना, तसेच दैनंदिन प्रशासकीय प्रक्रिया यांची सविस्तर माहिती देण्यात आली. पोलिस ठाण्यात वापरात असलेल्या शस्त्रांची ओळख करून देत त्यांचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोलिस प्रशासनाची कार्यपद्धती जवळून पाहण्याची संधी मिळाली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, इंग्रजांविरुद्ध झालेल्या चळवळी, स्वातंत्र्यानंतरची पोलिस व्यवस्था, तसेच वाहतूक नियम, वेगमर्यादा, वाहतूक शिस्त व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत सखोल माहिती दिली.

पोलिस स्टेशनमधील दैनंदिन कार्यालयीन कामकाज कसे चालते, याचेही त्यांनी सविस्तर विवेचन केले.
पोलिस हवालदार रवी आहेर यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याची प्रक्रिया, सभा व मिरवणुकांदरम्यानचा बंदोबस्त, तसेच पोलिस ठाण्यामधील १७ विविध विभागांचे कार्य विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
सहाय्यक पोलिस निरीक्षक तानाजी भापकर यांनी बंदुका व रायफल्सची रेंज, वापराची पद्धत आणि सुरक्षिततेचे नियम प्रात्यक्षिकासह स्पष्ट केले.
या कार्यक्रमास विविध अधिकारी, कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते. इयत्ता आठवीतील एकूण ८३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदा, सुव्यवस्था व सार्वजनिक सुरक्षेबाबत जनजागृती झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
