पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तुपे वस्ती येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सामाजिक कार्यकर्त्या कोमल गणेश कांबळे व गणेश कांबळे यांच्या वतीने टीव्ही संच भेट देण्यात आला.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व प्रभावी शिक्षण मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेला टीव्ही संच प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दृकश्राव्य माध्यमांच्या सहाय्याने अध्यापन अधिक रंजक व समजण्यास सोपे होणार असून, विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेत वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केला.

विशेषतः डिजिटल शिक्षण, शैक्षणिक व्हिडीओ, माहितीपट आणि विविध अभ्यासक्रमाशी संबंधित दृश्य सामग्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नव्या पद्धतीने ज्ञान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटपही करण्यात आले. सामाजिक उपक्रमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणसुविधा मिळाव्यात, यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्त्या कोमल कांबळे, गणेश कांबळे, युवा उद्योजक अभिजीत धुमाळ, मेजर दिलीप घाडगे, पियुष बुराडे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक जयवंत पवार, शिक्षिका अंबिका कुंजीर, रूपाली काळे, मीना कांबळे, संजना खेडेकर, सारिका ताटे, सुरेखा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका ताटे यांनी केले, तर आभार भाजप सरचिटणीस सुनील तुपे यांनी केले.
या उपक्रमाबद्दल शाळा प्रशासन व पालकांनी कोमल कांबळे व गणेश कांबळे यांचे विशेष आभार मानले.