पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या मार्गदर्शनाखाली रमेश फिरोदिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, साकूर येथे निर्भय कन्या अभियान अंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणासाठी दि. ४ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. महिलांचे कायदे, स्वसंरक्षण आणि आरोग्य या महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

या व्याख्यानमालेत ॲड. रंजना गवांदे यांनी महिलांचे कायदे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. महिलांना मिळणारे कायदेशीर हक्क, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा, स्री वारसा हक्क, लैंगिक छळविरोधी कायदे, गर्भलिंग चिकित्सा विरोधातील कायदा , तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया याबाबत त्यांनी सखोल माहिती दिली. महिलांनी अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

दुसऱ्या सत्रात राजेंद्र अंकप यांनी महिलांसाठी कराटे प्रशिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. स्वसंरक्षणाचे महत्त्व स्पष्ट करत दैनंदिन जीवनात उद्भवू शकणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करावे, याचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले.

आत्मविश्वास, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक बळासाठी कराटे प्रशिक्षण उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले. तिसऱ्या दिवशी डॉ. कविता साळवे यांनी महिलांची आरोग्याची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य, संतुलित आहार, नियमित व्यायाम, तसेच महिलांमध्ये आढळणाऱ्या सामान्य आजारांविषयी सविस्तर माहिती दिली. आरोग्याची काळजी घेणे हे महिलांच्या सशक्तीकरणासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हेमलता राठोड होत्या. अध्यक्षीय भाषणात त्यांनी निर्भय कन्या अभियानाचे महत्त्व अधोरेखित करत महिलांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी शिक्षणासोबतच कायदेविषयक जाणीव, आरोग्यविषयक सजगता आणि स्वसंरक्षण कौशल्ये आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.उपप्राचार्य डॉ. सचिन घोलप यांनी आपल्या मनोगतात महिलांच्या स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या काळात महिलांनी शारीरिकदृष्ट्या सक्षम असण्याबरोबरच मानसिकदृष्ट्या निर्भय व सजग असणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.

निर्भय कन्या अभियानामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, कायदेविषयक जाणीव आणि स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो. अशा उपक्रमांमुळे महिला केवळ स्वतःचे संरक्षणच करत नाहीत, तर समाजातही बदल घडविण्याची ताकद प्राप्त करतात, असे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यातही महिलांच्या सक्षमीकरणासाठी असे उपक्रम सातत्याने राबविले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

या तीन दिवसीय व्याख्यानमालेस विद्यार्थिनी, महिला प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी तज्ज्ञ वक्त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्य डॉ सचिन घोलप व विद्यार्थी विकास मंडळ समन्वयक प्रा . रंजित गिरी, प्रा. सागर गोसावी,प्रा. दिपक मेंगाळ,vप्रा. पल्लवी वाणी, व महिला शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *