पुणे : उरुळी कांचन पंचायत समिती गणात अपक्ष उमेदवार अश्विनी समाधान तुपेरे यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली असून, त्यांच्या आक्रमक आणि विकासाभिमुख भूमिकेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. “ सत्ता नव्हे, सेवा हेच ध्येय ” असा थेट संदेश देत तुपेरे यांनी गावागावात जनतेशी संवाद साधत परिवर्तनाचा नारा दिला आहे.

गावचा सर्वांगीण विकास हे केंद्रस्थानी ठेवत त्यांनी प्रत्येक वस्तीपर्यंत पिण्याचे शुद्ध पाणी, सिमेंट व डांबरी रस्ते, पथदिवे, नियमित नाला-सफाई व स्वच्छता व्यवस्था सक्षम करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले आहे. आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत प्राथमिक आरोग्य केंद्र बळकट करणे, माता-बाल आरोग्यावर विशेष लक्ष, तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचा सातत्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

शिक्षण क्षेत्रात शाळांमध्ये स्वच्छ पाणी व शौचालय सुविधा, डिजिटल शिक्षणाची उपलब्धता, गरिब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व मार्गदर्शन या मुद्द्यांवर तुपेरे ठाम आहेत. शेतकऱ्यांसाठी वेळेवर पीक विमा व अनुदान, प्रभावी पाणी व्यवस्थापन आणि सिंचन सुविधांवर भर देत शेतीला शाश्वत बळ देण्याचा त्यांचा अजेंडा आहे.

महिला व युवकांसाठी स्वयंरोजगार योजना, बचत गटांना प्रोत्साहन, कौशल्य विकासातून रोजगारनिर्मिती आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी, वीज-रस्ते-पाणी या मूलभूत सुविधा सर्वांसाठी, विशेषतः वंचितांना प्राधान्य देण्याची भूमिका त्यांनी मांडली.

पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण आणि प्रत्येक विकासकामाचा जाहीर अहवाल देण्याचा निर्धार करत तुपेरे यांनी लोकसहभागातून विकास साधण्याचा ठाम मानस व्यक्त केला आहे. या विकासाभिमुख धोरणांना अधिक बळ देत उरुळी कांचनमध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवण्याचा संकल्प मतदारांनी केला असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *