पुणे : हडपसरमधील काळेपडळ परिसरातून एका तरुणाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जुन्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली असून, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींसोबत असलेल्या एका अल्पवयीनाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रसाद वीरभद्र देवज्ञे (वय २१, रा. चिखले वाडा, नंदुरवेस गल्ली, परळी, जि. बीड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी किरण भैरू चव्हाण (वय ३२) आणि रोहित भरत गायकवाड (वय १८, दोघे रा. हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे. अन्य साथीदारांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण चव्हाण आणि प्रसाद देवज्ञे यांच्यात सुमारे दोन महिन्यांपूर्वी वाद झाला होता. त्या वेळी झालेल्या मारहाणीप्रकरणी प्रसादविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तो कोल्हापूर येथे गेला होता. न्यायालयीन कामानिमित्त दोन ते तीन दिवसांपूर्वी तो पुन्हा पुण्यात आला होता.
मंगळवारी (३० डिसेंबर) दुपारी साडेचारच्या सुमारास किरण चव्हाण याने प्रसादला काळेपडळ परिसरात पाहिले. त्यानंतर त्याने आपल्या साथीदारांना तेथे बोलावून घेतले. संशयितांनी प्रसादला मारहाण करून मोटारीतून संकेतविहार कॉलनी परिसरातील मोकळ्या जागेत नेले. तेथे त्याचा खून करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच फुरसुंगी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रसादला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

घटनेनंतर पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद पवार करीत आहेत.
