पुणे : वानवडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल गुरुवारी (ता. ५) पुण्यातील शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात देण्यात आला.

गुन्हा क्रमांक ८०१/२०२० अंतर्गत भा.द.वि. कलम ३७६, ३७६ (अ, ब) तसेच पोक्सो कायद्यातील कलम ३ (क), (ड), ४, ५ (म), ६, ७, ८, ११ (१)(३), १२ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी कुंडलिका गुलाबराव जाधव (वय ४६, रा. राजू गांधी कॉलनी, तरवडे वस्ती, मांजरी-महादेववाडी, हडपसर, जि. पुणे) याला २८ ऑगस्ट २०२० पासून अटक करून कारागृहात ठेवण्यात आले होते.

या प्रकरणाची सुनावणी विशेष केस क्रमांक ६२८/२०२० अंतर्गत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एम. के. महाजन यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने आरोपीला पोक्सो कायद्यातील कलम ५ (म) व ६ अंतर्गत दोषी धरत २० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १ वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.

तसेच पोक्सो कायद्यातील कलम ११ (२)(३) व १२ अंतर्गत आरोपीला ३ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास ६ महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.

या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अभिजीत जोगदंड व पोलिस उपनिरीक्षक संदीप वरपे यांनी केला. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. मिलिंद डी. दातरंगे यांनी काम पाहिले.

या प्रकरणावर पोलिस उपआयुक्त (परिमंडळ ५) शिवणकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज पार पडले. सत्र न्यायालयात पैरवी अंमलदार म्हणून पोलिस हवालदार (क्र. ७५९०) जाधव यांनी पाठपुरावा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *