पुणे : सोलापूर जिल्हा वार्षिक योजनेतील मूळ ६९३ कोटी रुपयांच्या आराखड्याव्यतिरिक्त तब्बल ३६५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महापुरानंतरच्या पुनर्बांधणीसाठी ३०० कोटी व पंढरपूर वारीसाठी कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी ६५ कोटी रुपयांची मागणी केली होती. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने जिल्ह्याला मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

जिल्हा वार्षिक योजनेची बैठक नुकतीच पार पडली. ६९३ कोटींच्या आराखड्याला जिल्हा नियोजन मंडळात मंजुरी देऊन तो राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई येथे झालेल्या बैठकीत पालकमंत्री गोरे यांनी अतिरिक्त निधीची मागणी ठामपणे मांडली.

अलीकडील महापुरामुळे सोलापूर जिल्हातील रस्ते, गटारे, शाळा, विद्युत खांब तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या सर्व ठिकाणी मूलभूत सुविधा पुन्हा उभारण्यासाठी ३०० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले.

तसेच पंढरपूर वारीदरम्यान होणारी गर्दी, वाहतूक कोंडी आणि स्वच्छतेच्या समस्यांचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र ६५ कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहरातील रस्ते व इतर पायाभूत सुविधांसाठी निधीची मागणी केली, तर आमदार समाधान आवताडे यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक डीपी समस्येसाठी विशेष तरतुदीचा आग्रह धरला. बैठकीस खासदार प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नुकत्याच निवडून आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना विकासकामांसाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी वाढीव तरतुदीची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका लक्षात घेता, जिल्ह्यातील नव्या पदाधिकाऱ्यांना विकासासाठी पालकमंत्र्यांकडून विशेष ‘गिफ्ट’ मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *