पुणे : लोणी-काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एडीटी) विद्यापीठ आणि रायन इंटरनॅशनल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स यांच्यात शैक्षणिक सहकार्य, नवोन्मेषाधारित शिक्षण आणि विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. एमआयटी शैक्षणिक संकुलातील इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या प्रा. एच. के. व्यास सभागृहात हा करार वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.

या कराराद्वारे शालेय आणि उच्च शिक्षण यांमध्ये दुवा निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. डिझाईन थिंकिंग, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांचा प्रारंभिक शिक्षणात समावेश करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, प्राध्यापकांचे मार्गदर्शन, शैक्षणिक भेटी तसेच एमआयटी एडीटी विद्यापीठातील मेकर्स्पेस व इनोव्हेशन लॅब्ससारख्या आधुनिक सुविधा खुल्या करण्यात येणार आहेत.

कार्यक्रमास रायन इंटरनॅशनल ग्रुपतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद शर्मा, उपाध्यक्षा निधी थापर आणि उपाध्यक्ष जॉन अॅलेक्स उपस्थित होते. एमआयटी एडीटी विद्यापीठातर्फे प्र-कुलगुरू डॉ. नचिकेत ठाकूर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दंडेश्वर बिसोयी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.
रायन इंटरनॅशनल संस्था समूह देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था असून, २० राज्ये व ४० शहरांतील १५० हून अधिक शाळांमधून सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. शैक्षणिक गुणवत्ता, व्यक्तिमत्त्व विकास तसेच क्रीडा, कला आणि नेतृत्वगुणांच्या विकासासाठी ही संस्था ओळखली जाते.
“उत्कृष्ट शिक्षणासाठी व्यापक अनुभव महत्त्वाचा आहे. या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना डिझाईन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल,” असे विनोद शर्मा यांनी सांगितले. तर “या करारातून कौशल्याधारित आणि सर्जनशील शिक्षणाची दिशा अधिक बळकट होईल,” असे डॉ. नचिकेत ठाकूर यांनी नमूद केले.
कार्यक्रमाची सुरुवात विश्वशांती प्रार्थनेने झाली असून सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.