पुणे : हवेली तालुक्यातील थेऊर–आव्हाळवाडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने दणदणीत विजय मिळवत भाजपला जबर धक्का दिला आहे. जिल्हा परिषद गट क्रमांक ४० आणि पंचायत समिती गण क्रमांक ७९ व ८० या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत विरोधकांचा अक्षरशः धुव्वा उडवला. अंतर्गत कुरबुरी, तिकीट वाटपातील नाराजी आणि स्थानिक पातळीवरील गटबाजीच्या चर्चांना छेद देत अजितदादांच्या नेतृत्वावर मतदारांनी ठाम विश्वास दाखवला आहे.

जिल्हा परिषद गट क्रमांक ४० (थेऊर–आव्हाळवाडी) मध्ये कोमल संदेश आव्हाळे यांनी तब्बल १४ हजार १४६ मतांच्या प्रचंड फरकाने विजय संपादन केला. आव्हाळे यांना २२ हजार ३४३ मते मिळाली, तर भाजपच्या पुष्पलता प्रकाश सावंत यांना केवळ ८ हजार १९७ मतांवर समाधान मानावे लागले. एवढ्या मोठ्या फरकामुळे थेऊर गटात राष्ट्रवादीची पकड किती मजबूत आहे, हे स्पष्ट झाले आहे.
पंचायत समिती गण क्रमांक ७९ (थेऊर) मध्येही राष्ट्रवादीचे युवराज हिरामण काकडे यांनी भाजपचे योगेश दत्तात्रय काकडे यांना ५ हजार २१२ मतांनी पराभूत केले. युवराज काकडे यांना ९ हजार १६६ मते मिळाली, तर भाजप उमेदवार ३ हजार ९५४ मतांवर थांबला. स्थानिक पातळीवर चुरशीची लढत अपेक्षित असताना निकाल मात्र एकतर्फी लागला.

गण क्रमांक ८० (आव्हाळवाडी–थेऊर) मध्ये सुषमा संतोष मुरकुटे यांनी ५ हजार ३०५ मतांच्या फरकाने विजय मिळवत भाजपच्या पूनम अशोक गायकवाड यांना मागे टाकले. मुरकुटे यांना ११ हजार २४८ मते, तर गायकवाड यांना ५ हजार ९८७ मते मिळाली. या निकालाने भाजपच्या स्थानिक संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
थेऊर गट हा मोठी मतदारसंख्या, अंतर्गत राजकीय समीकरणे आणि स्थानिक वर्चस्वाच्या संघर्षामुळे हवेली तालुक्यातील ‘हॉट सीट’ मानला जात होता. थेऊर गावातून पंचायत समितीसाठी दोन उमेदवार रिंगणात असतानाही राष्ट्रवादीने संघटित शक्ती दाखवत तिन्ही जागांवर विजय मिळवला.
या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदेत १ आणि पंचायत समितीत २ जागा मिळाल्या आहेत. या दणदणीत यशामुळे हवेली तालुक्यात अजित पवार गटाची राजकीय ताकद अधिक भक्कम झाली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात थेऊर गट निर्णायक ठरणार, हे स्पष्ट झाले आहे. भाजपसमोर आता आत्मपरीक्षणाशिवाय पर्याय उरलेला नाही.