पुणे : आटपाडी (जि. सांगली)
निंबवडे जिल्हा परिषद गटातून शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या विद्या सचिन मोटे यांनी सत्ताधारी आमदार गोपीचंद पडळकर व त्यांच्या समर्थकांकडून धमक्या, मारहाण, दहशत व बूथ कॅप्चरिंगचे प्रकार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
संबंधित घटनांचे व्हिडिओ पुरावे माध्यमांसमोर सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पक्षादेशानुसार मैत्रीपूर्ण लढत असतानाही विरोधकांनी निवडणूक वैयक्तिक अहंकाराची बनवली. “जिल्हा परिषद अध्यक्षपद घरातच राहावे, यासाठी आमदारांनी विशेष लक्ष दिले. जागा हातातून जात असल्याचे दिसताच आमच्या कार्यकर्त्यांना फोनवर व प्रत्यक्ष भेटून धमक्या देण्यात आल्या,” असा आरोप त्यांनी केला.

विभूतवाडी येथे प्रचारादरम्यान त्यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आल्याचे, तर बनपुरी व घरनिकी परिसरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीकडून हवेत गोळीबार करून मतदारांमध्ये भीती निर्माण केल्याचेही त्यांनी नमूद केले. मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांच्या राहत्या घरी ३० ते ४० जणांच्या गटाने हल्ला केल्याचा आरोप करत, या घटनेत ब्रह्मानंद पडळकर यांच्या नेतृत्वाचा उल्लेख त्यांनी केला.
“स्वतः आमदारांनी काही वाहनं अडवून लोकांना मारहाण व शिवीगाळ केली. ‘गृहमंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री आपले आहेत; कुणी काही वाकडे करू शकत नाही,’ असे सांगून प्रशासनावर दबाव टाकण्यात आला,” असा दावा मोटे यांनी केला. विरोध करणाऱ्या संजय पडळकर यांच्या पायावर वाहन घालण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला असून, त्यासंदर्भातील व्हिडिओ उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

काही ठिकाणी बूथ कॅप्चरिंग झाल्याचा आरोप करत त्यांनी म्हटले की, “आमच्या बूथ व पॉलिंग एजंटना घरात जाऊन धमक्या दिल्या गेल्या. दहशतीमुळे एजंटना पोलीस वाहनातून मतदान केंद्रावर ने-आण करावी लागली.”
धनगर, बहुजन व हिंदू समाजाचे नेते म्हणून राज्यभर ओळख असलेल्या आमदार पडळकरांवर टीका करत मोटे म्हणाल्या, “मी स्वतः धनगर, बहुजन आणि हिंदू असूनही मला दिलेला त्रास पाहता त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे.”
या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे केली. “आटपाडीचा बिहार होऊ देऊ नका; सांगली जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तातडीने पावले उचला,” असे भावनिक आवाहन त्यांनी प्रशासन, माध्यमे व जनतेला केले.