पुणे : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आपणा सर्वांचे आदर्श व्यक्तिमत्त्व असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढले. वारजे येथील शिवभक्त प्रतिष्ठानचे संस्थापक शिवभक्त अनिकेत जावळकर यांनी नवी दिल्लीत शहा यांची भेट घेऊन शिवाजी महाराजांवरील पुस्तक भेट दिले. यावेळी शहा यांनी आपण नुकतेच छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘छावा’ हे पुस्तक वाचल्याचे सांगितले.

या प्रसंगी अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके उपस्थित होते. महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने युवक राजकारणात प्रवेश करत असल्याचे नमूद करताना, तरुणांचा वाढता सहभाग लोकशाही अधिक बळकट करेल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. खासदार लंके यांनी अहिल्यानगरमधील विविध प्रश्नांसह गृह विभागाशी संबंधित मुद्द्यांवर शहा यांच्याशी चर्चा केली.

उत्साहपूर्ण वातावरणात भेट
शहा यांच्याशी झालेली भेट अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्याची माहिती अनिकेत जावळकर यांनी दिली. त्यांच्या कार्यालयातील भारदस्त वातावरण आणि चोख सुरक्षा व्यवस्था पाहून आपण भारावून गेलो होतो, असे ते म्हणाले. खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या दहा मिनिटांच्या भेटीत निम्म्यापेक्षा अधिक वेळ संवाद आपल्याकडूनच झाला, असेही त्यांनी सांगितले.
“तुम्ही नावापुढे ‘शिवभक्त’ लावता, मग तुम्ही भगवान शंकराचे भक्त आहात का?” असा प्रश्न शहा यांनी विचारल्याचे जावळकर यांनी सांगितले. त्यावर आपण छत्रपतींचे शिवभक्त असल्याचे उत्तर दिल्याचे त्यांनी नमूद केले. ही भेट आपल्या जीवनातील संस्मरणीय क्षण असल्याची भावना जावळकर यांनी व्यक्त केली.