पुणे : प्रयागधाम (ता. हवेली, जि. पुणे) येथे सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान तोतया मतदान करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, बनावट मतदार ओळखपत्रांचा वापर करून मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १७२ अंतर्गत उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी नवनाथ बारीकराव कांचन (वय ४१, व्यवसाय – नोकरी, रा. आश्रम रोड, उरूळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. सदर गुन्हा दि. ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास प्रयागधाम गावाच्या हद्दीत घडला असून, सायंकाळी सातच्या सुमारास गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

आरोपी सुवर्णा मनोहर पांचाळ (वय ४८), सौ. वनिता मोहन ताठे (वय ३८) व लक्ष्मण प्रकाश बडगे (वय २१) हे सध्या काळेपडळ, हडपसर येथे वास्तव्यास असून, त्यांनी बनावट मतदार ओळखपत्रे सादर करून इतर व्यक्तींच्या नावाने मतदान करण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

आरोपींनी अनुक्रमे भाग क्र. ३३९/१० मधील मतदार सुनिता राजाराम, भाग क्र. ३३९/१२० मधील रोशनी किशोर जुरेमलानी तसेच भाग क्र. ३३९/३ मधील मतदार महेश हरीदास कुतवळ यांच्या नावाने मतदान कार्ड दाखवून मतदान करण्याचा प्रयत्न केला. मात्र, निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळेत उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. आरोपींचा यापूर्वी कोणताही गुन्हेगारी इतिहास नसल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *