पुणे : श्रीराम जन्मोत्सवाच्या पावन निमित्ताने उरुळी कांचन नगरीत भक्तिभावाचा सागर उसळला असून, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी अखंड पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचा दिव्य सोहळा मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. उरुळी कांचन देवस्थान संस्था, भैरवनाथ सेवा समिती, ग्रामपंचायत तसेच समस्त ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा आध्यात्मिक सोहळा येत्या शुक्रवार, दि. २७ मार्च २०२६ पर्यंत श्रीराम मंदिरात भक्तिभावाने पार पडणार आहे.

या सप्ताहात दररोज काकड आरतीने प्रभात उजाडत असून, ज्ञानेश्वरी ग्रंथवाचन, विष्णुसहस्त्रनाम, गाथा भजन, महिला भजन, हरिपाठ, प्रवचन, हरिकीर्तन आणि हरिजागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांची सुरेख मांडणी करण्यात आली आहे. संपूर्ण परिसर ‘रामनाम’च्या गजराने दुमदुमून गेला असून, भक्तिमय वातावरणाने उरुळी कांचन नगरी अक्षरशः न्हाऊन निघाली आहे.
कार्यक्रमाचे व्यासपीठ संचालन हभप प्रमिला महाराज तळेकर व हभप बाळासाहेब महाराज सिद्ध यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. दररोज नामवंत कीर्तनकार आणि प्रवचनकार यांच्या उपस्थितीत भक्तांना अध्यात्माची मेजवानी लाभत आहे.

सोमवार ते बुधवार (दि. २३ ते २५) दरम्यान हभप सुरेश महाराज जाधव, हभप सुनीता महाराज कुंजीर, हभप प्रमिला महाराज तळेकर यांच्या प्रवचनांनी आणि संबंधित कीर्तनकारांच्या सादरीकरणांनी भक्तीची उंची गाठली जाणार आहे.
गुरुवार, दि. २६ मार्च रोजी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त विशेष कीर्तन हभप गणेश महाराज पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी १० ते १२ वाजता होणार असून, दुपारी ४ वाजता दिंडी प्रदक्षिणेचा भव्य सोहळा पार पडणार आहे.
सायंकाळी हभप बाळकृष्ण महाराज डांगे यांचे हरिकीर्तन होईल.
सप्ताहाचा समारोप शुक्रवार, दि. २७ मार्च रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत हभप रमेशानंदजी जाधव यांच्या ‘काल्याचे कीर्तन’ने होणार असून, भक्तिभावाच्या या अखंड प्रवाहाची सांगता होईल.
या वर्षी सप्ताहाचे ३९वे वर्ष साजरे होत असून, परंपरेची अखंड ज्योत जपणाऱ्या या सोहळ्यामुळे उरुळी कांचनच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक वैभवात भर पडली आहे. श्रद्धा, भक्ती आणि नामस्मरणाच्या या मंगल संगमाला ग्रामस्थांसह भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.