पुणे : राज्यस्तरीय स्वर मल्हार व नृत्य मल्हार आंतरशालेय स्पर्धेत एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचे नाव संपूर्ण राज्यभर उज्वल केले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील ३०० हून अधिक शाळांनी सहभाग नोंदवला होता.

स्वर मल्हार स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या सुरेल, प्रभावी गायनाने परीक्षकांची मने जिंकत घवघवीत यश मिळवले. समूह गीत गायनात विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सोलो भजन गायन प्रकारातही प्रथम क्रमांक मिळवण्यात आला. तसेच सोलो कराओके गायनात विद्यार्थ्यांनी प्रथम व तृतीय क्रमांक मिळवून शाळेच्या यशात भर घातली. विशेष म्हणजे शाळेने तीन वेगवेगळ्या गटांमध्ये सहभाग घेत तिन्ही गटांमध्ये यश संपादन केले.

नृत्य मल्हार स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट सादरीकरणातून प्रभाव पाडला. इयत्ता पहिली ते चौथी ओपन डान्स स्टाईल गटात द्वितीय क्रमांक, इयत्ता आठवी ते दहावी ओपन डान्स स्टाईल गटात द्वितीय क्रमांक, तर इयत्ता आठवी ते दहावी लोकनृत्य गटात तृतीय क्रमांक मिळवण्यात विद्यार्थ्यांना यश आले.
या दैदीप्यमान यशामागे शाळेचे संगीत विशारद व संगीत शिक्षक ऋषिकेश पानसरे तसेच नृत्य शिक्षक श्री. सुमित झाकडे आणि कु. श्रेया देशपांडे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.

या यशाबद्दल संस्थेच्या डायरेक्टर परविन इराणी, मुख्याध्यापिका शमशाद कोतवाल, शिक्षकवृंद व पालकांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद व पालकांनी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *