पुणे : येथील गणेश कला, क्रीडा व सांस्कृतिक भवन, स्वारगेट येथे नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल अबॅकस कॉम्प्युटिशन स्पर्धेत सौ. अनिता अनिरुद्ध मराठे यांना सलग तिसऱ्यांदा ‘बेस्ट अबॅकस टीचर अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून १,५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना १ ते १०० पर्यंत पाढे, वैदिक मॅथ्स तसेच फोनिक्स साऊंड्सचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढून गणित अधिक सोपे व रंजक बनते. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारीही अधिक सुलभ होते. अबॅकस पद्धतीमुळे विद्यार्थी अभियांत्रिकीसह विविध उच्च शिक्षणाच्या परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकतात, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील शिवसाई अबॅकस क्लासेसमधील अनेक विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. सौ. अनिता मराठे यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती दूर होऊन गणिताविषयी रुची निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थी विविध क्षेत्रांत आपले नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा परिस्थितीत गणिताची भक्कम पायाभरणी होण्यासाठी अबॅकस शिक्षण अत्यंत आवश्यक असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ व पालकांनी व्यक्त केले. पुढील काळात अधिकाधिक विद्यार्थी व पालकांनी अबॅकस शिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
