पुणे : शिंदवणे गावात हॉटेलमध्ये मुलांना जेवण देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तिघांनी हॉटेल चालकाला लाकडी दांडका व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश बाजीराव मांढरे (वय ४०, व्यवसाय – शेती व हॉटेल, रा. शिंदवणे, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना दि. १२ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे ४.०० वाजण्याच्या सुमारास शिंदवणे गावातील ग्रामपंचायतीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत घडली.
याबाबत श्रवण संतोष शिंदे, श्रेयस संदीप शिंदे आणि संग्राम शंकर शिंदे (सर्व रा. शिंदवणे, ता. हवेली, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मांढरे हे हॉटेल व्यवसाय करत असून मुलांकडून जेवणाचे पैसे घेत असल्याच्या कारणावरून आरोपींनी वाद घालत “ही आमची हद्द आहे, येथे हॉटेल चालवायचे असेल तर मुलांना जेवायला द्यावे” असे म्हणत त्यांच्यावर हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
आरोपींनी लाकडी दांडका व लोखंडी रॉडने मांढरे यांना कानावर, डोक्याच्या पाठीमागील बाजूस, कंबरेवर, पोटावर, तोंडावर तसेच डाव्या हातावर मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डाव्या हाताच्या करंगळीचे हाड फ्रॅक्चर झाले असल्याचे सांगण्यात आले.
या घटनेप्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९/२०२६ अन्वये बी.एन.एस. कलम ११७(२), ११८(१), ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास उरुळी कांचन पोलिस करीत आहेत.