पुणे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अष्टापूर या शाळेने शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत झालेल्या मूल्यमापनात ‘अ+’ श्रेणी प्राप्त करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे अष्टापूर ही ‘अ’ श्रेणी प्राप्त करणारी तालुक्यातील एकमेव शाळा ठरली आहे.
राज्यातील सर्व शाळांचे गुणवत्ता मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यभरातील शाळांचे सहा प्रमुख क्षेत्रांमध्ये मूल्यमापन करण्यात आले.

यामध्ये (१) अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र व मूल्यमापन, (२) पायाभूत सुविधा, (३) मानवी संसाधने व शालेय नेतृत्व, (४) समावेशक पद्धती व लिंगसमभाव, (५) व्यवस्थापन, संनियंत्रण व प्रशासन आणि (६) लाभार्थी समाधान या क्षेत्रांचा समावेश होता. या सर्व निकषांमध्ये अष्टापूर शाळेने उत्कृष्ट कामगिरी करत ‘अ+’ श्रेणी पटकावली.
शाळेत विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रम राबविले जात असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ‘इंटरॲक्टिव्ह पॅनेल’च्या माध्यमातून अध्यापन केले जाते. सन २०२४-२५ मध्ये ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमात शाळेने तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे.

शाळेच्या विकासासाठी यशवंत सहकारी साखर कारखानाचे अध्यक्ष सुभाष (अप्पा) जगताप यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. यापुढेही शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शाळा व्यवस्थापन समितीच्या सक्रिय सहभागामुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी हेमंतकुमार खाडे यांनी शाळेचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस मार्गदर्शन करण्याचे आश्वासन देत शुभेच्छा दिल्या.