पुणे – येरवडा परिसरात मित्राच्या लग्नाच्या वरातीदरम्यान झालेल्या किरकोळ वादातून सुरु झालेल्या भांडणाचे रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाले होते. या प्रकरणात आरोपी संदीप मोहन खंडागळे उर्फ डोंगरया (वय ३४, रा. जयजवाननगर, येरवडा) याला पुणे सत्र न्यायालयाने दोषी धरत १० वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागणार आहे. हा निकाल मा. न्यायमूर्ती एम. जी. चव्हाण यांच्या कोर्टात मंगळवारी (दि. ०९ डिसेंबर २०२५) घोषित करण्यात आला.

हि घटना २३ नोव्हेंबर २०१६ रोजी सायंकाळी सुमारे सात ते साडेसातच्या दरम्यान घडली होती. आरोपी आणि फिर्यादी आकाश किशन राठोड यांच्यात वर्षभरापूर्वी झालेल्या वादाची कुरापत तसेच वरातीत पुन्हा झालेल्या बाचाबाचीच्या रागातून आरोपीने आकाशचा पाठलाग केला. जयजवाननगर परिसरात आकाशला गाठून त्याच्यावर चाकूने गळ्यावर वार करत त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले. गंभीर जखमी अवस्थेत आकाशला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या गुन्ह्याची तपास अधिकारी महिला सहायक निरीक्षक सीमा ढाकणे होत्या. सध्या त्या चंदननगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून मा. जावेद खान व मा. शुभांगी देशमुख यांनी सरकारी बाजू प्रभावीपणे मांडली. घटनेचे साक्षी, वैद्यकीय पुरावे, तसेच हल्ल्यानंतर आरोपीचा पळ काढण्याचा प्रयत्न आदी सर्व बाबींची छाननी करून न्यायालयाने आरोपीचा दोष सिद्ध केला.

सरकारी पक्षाच्या ठोस युक्तिवादानंतर न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम ३०७ (खून करण्याचा प्रयत्न) अंतर्गत आरोपीस कठोर शिक्षा ठोठावली. या निकालामुळे पीडित पक्षास न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत असून स्थानिक परिसरातही समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *