पुणे: मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल, भोर तालुक्यातील वाठार हिंगे येथील मुरारबाजी देशपांडे विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री. बापू यादव चेमटे यांना यावर्षीचा मानाचा ‘आदर्श शिक्षक महाराष्ट्र भाषा रत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

अमृतानुभव फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने आयोजित ‘विश्व मराठी भाषा कर्तृत्व संमेलन २०२६’ मध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडला. जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून, बापू सर यांनी क्रीडा क्षेत्रात अनेक गुणवंत खेळाडू घडवल्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सुप्रसिद्ध पार्श्वगायक ज्ञानेश्वर मेश्राम, युवा उद्योजक राहुल पाटील, चित्रपट निर्माते संदीप राक्षे आणि स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. बी. एन. खरात यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भविष्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचा मानस: पुरस्काराला उत्तर देताना चेमटे सर म्हणाले की, “हा सन्मान राजगड ज्ञानपीठ संस्था, मुख्याध्यापक आणि माझ्या विद्यार्थ्यांच्या प्रेमाचे फळ आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली असून, भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारे खेळाडू घडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
या यशाबद्दल राजगड ज्ञानपीठचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. अनंतरावजी थोपटे, अध्यक्ष आ. श्री. संग्रामदादा थोपटे, मानद सचिवा, जिल्हा परिषद सदस्य मा.सौ. स्वरुपाताई थोपटे, उपाध्यक्ष श्री. पृथ्वीराज थोपटे, विशेष कार्यकारी अधिकारी श्री. एकनाथ ओंबळे आणि मुख्याध्यापिका सौ. आत्तार हसिना रसिक यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. शैक्षणिक व क्रीडा वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे