पुणे : वाढदिवस हॉटेल, लॉन्स किंवा खासगी समारंभात न साजरा करता, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक सागर बाळासाहेब कांचन यांनी उरुळी कांचन (ता. हवेली) येथील तुपे वस्ती परिसरातील जिल्हा परिषद शाळा व महावीर मतिमंद निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर साजरा केला.
यावेळी तुपे वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील तब्बल २०० विद्यार्थ्यांना उबदार जर्किंग (स्वेटर) वाटप करण्यात आले. तसेच महावीर मतिमंद निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर केक कापून त्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
वाढदिवसाच्या नावाखाली होणारा अनावश्यक खर्च टाळून तोच खर्च विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व गरजांसाठी वापरावा, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दलची गोडी वाढते आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यास मदत होते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना सागर कांचन म्हणाले, “माझा वाढदिवस हा जिल्हा परिषद शाळा व महावीर मतिमंद निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर साजरा करण्याचे मनात आले. विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण मिळावे, यासाठी स्वेटर वाटप केले. या चिमुकल्यांसाठी काहीतरी करण्याचे जे मनात होते, ते प्रत्यक्षात उतरवले, याचे समाधान आहे.”
या उपक्रमाचे उरुळी कांचनसह परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात येत आहे.
यावेळी यशवंत कारखान्याचे संचालक संतोष कांचन, उरुळी कांचनच्या माजी सरपंच ऋतुजा कांचन, अमित (बाबा) कांचन, मयूर कांचन, भाऊसाहेब कांचन, माजी उपसरपंच युवराज कांचन, भाऊसाहेब तुपे, रामदास तुपे, जितेंद्र बडेकर, सदस्य शंकर बडेकर, तंटामुक्ती अध्यक्ष महादेव कांचन, भाजपा नेते अजिंक्य कांचन, सामाजिक कार्यकर्ते सुभाष बगाडे, काळुराम मेमाणे, सविता कांचन, सारिका लोणारी, पूजा सणस, अप्पा वाघमोडे, रोहिदास मुरकुटे, निखिल कांचन, भाजपाचे अमित कांचन, खुशाल कुंजीर, उद्योजक अभि कांचन, डॉ. संतोष कांचन, पांडुरंग कांचन, तसेच परिसरातील आजी माजी पदाधिकारी, शाळेतील शिक्षक, व परिसरातील तरुणांनी मोठी गर्दी केली होती.
