पुणे : महाशिवरात्रीनिमित्त ब्रह्माकुमारी यांच्या वतीने बाणेर येथील रायकर फार्म हाऊस परिसरातील ब्रह्माकुमारीज सेंटरमध्ये सहस्र शिवलिंग दर्शन, अर्धनारीश्वराचा जिवंत देखावा तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ तृप्ती देसाई (बिग बॉस मराठी फेम, अध्यक्षा – भू माता ब्रिगेड) यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी दिग्दर्शक व नृत्यांगना वैशाली जाधव, संजय कृष्णा रायकर, घनश्याम रायकर, ब्रह्माकुमारी बाणेर शाखेच्या संचालिका डॉ. त्रिवेणी दिदी, सकाळनगरच्या संचालिका बी.के. गीता दिदी, तसेच ब्रह्माकुमारी संस्थेचे सदस्य आणि आरोग्य शिबिरातील डॉक्टर उपस्थित होते.
तृप्ती देसाई म्हणाल्या, “ब्रह्माकुमारींच्या माध्यमातून अर्धनारीश्वराच्या देखाव्याद्वारे महिला-पुरुष समानतेचा प्रभावी संदेश देण्यात आला आहे. भू माता ब्रिगेडच्या माध्यमातून महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. महिलांनी स्वबळावर आपले कर्तृत्व सिद्ध करावे, याची प्रचिती येथे दिसून येते. या केंद्रात बहुसंख्य महिला विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडताना दिसतात.”

महाशिवरात्रिच्या दिवशी आयोजित आरोग्य शिबिराचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला. ४८ नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. शिबिरात विविध आजारांची विनामूल्य तपासणी करण्यात आली. तसेच नाडी चिकित्सक डॉ. मंगेश यांचे मार्गदर्शन सत्रही संपन्न झाले.
आध्यात्मिक वातावरणात शिवभक्तांनी सहस्र शिवलिंगांचे तसेच अर्धनारीश्वराच्या जिवंत देखाव्याचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली. धार्मिकतेबरोबरच समाजहिताचे उपक्रम राबविण्यात आल्याने या कार्यक्रमास विशेष महत्त्व प्राप्त झाले.