पुणे : विश्रांतवाडी आणि हडपसर परिसरात घरफोडीच्या दोन स्वतंत्र घटना उघडकीस आल्या असून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण सुमारे एक लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

या प्रकरणी विश्रांतवाडी आणि काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

विश्रांतवाडी येथील विद्यानगर भागातील नवआकांक्षा सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे एक लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. याबाबत संबंधित तरुणाने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांचे कुटुंबीय २८ डिसेंबर रोजी बाहेरगावी गेले होते. मंगळवारी (३० डिसेंबर) घरी परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक महेश भोसले करीत आहेत.

दरम्यान, हडपसर येथील सय्यदनगर परिसरातही अशीच घरफोडीची घटना समोर आली आहे. गल्ली क्रमांक १२ येथील एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील कपाटातून सोन्याचे गंठण आणि साडेपाच हजार रुपयांची रोकड लांबविली. या चोरीत सुमारे ६५ हजार ५०० रुपयांचा ऐवज गेला आहे.

याप्रकरणी संबंधित नागरिकाने काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना २९ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक विनायक गुरव करीत आहेत.

शहरात सुट्ट्यांच्या काळात घरफोडीच्या घटनांत वाढ होत असल्याचे चित्र असून, नागरिकांनी घर बंद ठेवताना आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *