पुणे : उरुळी कांचन ग्रामपंचायत सभागृहात सोमवारी (ता. २९) पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत प्रचंड गोंधळ, जोरदार वादविवाद आणि ग्रामस्थांच्या दबावानंतर अखेर ग्रामपंचायत प्रशासनाला माघार घ्यावी लागली. निवासी मालमत्ता कर, घरपट्टी व इतर करांच्या थकबाकीवर ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली. जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन, माजी उपसरपंच रामदास तुपे आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप कांचन तसेच ग्रामस्थ यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने ग्रामस्थांनी पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत केले.

विशेष ग्रामसभेच्या सुरुवातीला ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे यांनी मागील सभेचे कामकाज (प्रोसिडींग) वाचून ते कायम करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर ‘विकसित भारत—रोजगार व आजीविका हमी (ग्रामीण) : VB-G RAM G अधिनियम, २०२५’ अंतर्गत जनजागृती, तसेच सन २०२६-२७ साठी विकास आराखडा तयार करण्यासंदर्भातील विषय सभेसमोर ठेवण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच मिलिंद जगताप यांच्या परवानगीने ऐनवेळचे विषयही चर्चेला घेण्यात आले.

मात्र, ऐनवेळी मांडण्यात आलेल्या कर थकबाकीवरील सवलत आणि तंटामुक्ती अध्यक्ष पद या विषयांवर चर्चा सुरू होताच सभागृहात एकच गोंधळ उडाला . ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक, मतभेद आणि तीव्र चर्चा रंगली. काही काळासाठी सभेचे नियंत्रण सुटल्याचे चित्र दिसून आले.
अखेर ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेपुढे प्रशासन नरमले आणि ५० टक्के करसवलतीचा निर्णय जाहीर करण्यात आला.

या निर्णयामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत ग्रामपंचायतीच्या निर्णयाचे स्वागत केले. “जनतेच्या दबावाशिवाय हा निर्णय झाला नसता,” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटली.

तंटामुक्ती अध्यक्ष पदावर अजूनही ‘अंधार’!

दरम्यान, तंटामुक्ती अध्यक्ष पदाबाबतचा घोळ अद्याप कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
१७ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने संतोष नरसिंग कांचन यांचे नाव तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाही. निवडीनंतरची आवश्यक प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
करसवलतीवर निर्णय घेण्यात आलेला असला तरी तंटामुक्ती अध्यक्ष पदाचा प्रश्न मात्र ‘जैसे थे’ असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर कायम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *