पुणे : विधान भवन येथे पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर आणि गटनेते गणेश बिडकर यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

पुणे शहरातील पायाभूत सुविधा बळकटीकरण, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना, नागरी सुविधा सुधारणा तसेच प्रलंबित विकास प्रकल्पांना गती देण्याबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या उभारणीसाठी राज्य सरकारचे सहकार्य आवश्यक असल्याचे महापौरांनी यावेळी नमूद केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे शहराच्या विकासासाठी राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही दिली. महत्त्वाच्या विकास प्रकल्पांसाठी आवश्यक निधी, प्रशासकीय मान्यता आणि धोरणात्मक निर्णय जलदगतीने घेण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे हे राज्यातील महत्त्वाचे शैक्षणिक, औद्योगिक आणि आयटी केंद्र असल्याने शहराचा नियोजनबद्ध विकास ही राज्याची प्राथमिकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

या वेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. तसेच रिपब्लिकन पक्षाचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, राज्य सचिव बाळासाहेब जानराव आणि भाजपचे दीपक नागपुरे यांचीही उपस्थिती होती.

या भेटीमुळे पुणे शहरातील विविध विकासकामांना नवे बळ मिळेल, असा विश्वास महापौर मंजुषा नागपुरे यांनी व्यक्त केला. शहराच्या प्रगतीसाठी राज्य सरकारसोबत समन्वयाने काम करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *