पुणे : सेवा हीच साधना आणि निसर्गसंवर्धन हीच जीवनाची दिशा मानणाऱ्या संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचा भव्य शुभारंभ रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत देशभर एकाच वेळी आयोजित करण्यात आला आहे. परम श्रद्धेय माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या अभियानाअंतर्गत पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी, मुळा, मुठा, भीमा, भामा, घोडनदी, पवना, वेळू, कुकरी, मिना, कऱ्हा, मांडवी, आनंदी या नद्यांसह शहरातील विविध तलावांवर एकूण ४२ ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. जलस्रोत स्वच्छ ठेवण्याबरोबरच पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले की, देशभरातील १५०० हून अधिक ठिकाणी ही मोहीम एकाच वेळी पार पडणार असून, तिचे अभूतपूर्व प्रमाण या उपक्रमाला ऐतिहासिक स्वरूप देणारे ठरेल. जलसंधारण आणि स्वच्छतेचा प्रभावी संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
पाणी हे जीवनाचा आधार आणि ईश्वराची अमूल्य देणगी असून त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे, ही जाणीव समाजात दृढ करणे हा अभियानाचा मुख्य हेतू आहे. बाबा हरदेव सिंह जी यांच्या प्रेरणादायी शिकवणीवर आधारित हा उपक्रम सन २०२३ मध्ये संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आला होता.

नद्या, तलाव, सरोवरे, विहिरी आणि झरे अशा नैसर्गिक जलस्रोतांच्या संरक्षणासाठी समर्पित या जनआंदोलनाने पहिल्या तीन टप्प्यांत सेवा, समर्पण आणि सहभागाचे उल्लेखनीय उदाहरण निर्माण केले आहे. त्याच यशाच्या बळावर चौथा टप्पा अधिक व्यापक, संघटित आणि दूरदृष्टीपूर्ण स्वरूपात राबविला जात आहे.
या निमित्ताने मधुर समूहगायन, जनजागृती चर्चासत्रे तसेच सोशल मीडिया मोहिमेद्वारे जलजन्य आजार व स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे. “मन निर्मळ असेल तर निसर्ग स्वच्छ राहतो आणि सेवेत समर्पण असेल तर समाजाचे नवनिर्माण होते,” हा संदेश या अभियानातून अधोरेखित करण्यात येणार आहे.
सतगुरू माताजींचा संदेश पृथ्वी पुढील पिढ्यांसाठी अधिक सुंदर, स्वच्छ आणि संतुलित ठेवण्याचा असून ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ हे अभियान त्या पवित्र संकल्पाचे मूर्त स्वरूप ठरणार आहे. समाजाला निसर्ग, समाज आणि आत्म्याशी जोडत करुणा, समतोल आणि सौहार्दपूर्ण भविष्याच्या दिशेने नेण्याचा संकल्प या उपक्रमातून व्यक्त होत आहे.