पुणे : महसूल प्रशासनातील वाढत्या अनियमितता, त्रयस्थांचा हस्तक्षेप आणि ई-हक्क प्रणालीकडे होत असलेले दुर्लक्ष यावर लोणी काळभोर अपर तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी तृप्ती कोलते-पाटील यांनी थेट कारवाईचा धडाका सुरू केला आहे. यासंदर्भात त्यांनी सर्व मंडल अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना कडक इशारा देणारे परिपत्रक जारी करून शिस्तभंगाची गंभीर चेतावणी दिली आहे.
शासनाच्या स्पष्ट मनाईनंतरही काही महसूल कार्यालयांत बाहेरील व्यक्ती काम करत असल्याच्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचल्या होत्या. नागरिकांचे शासकीय अभिलेख हाताळणे, आर्थिक व्यवहार करणे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने पैशांची मागणी केल्याचे दाखलेही समोर आले आहेत. “ शासकीय कार्यालयात खासगी व्यक्ती ठेवणे हा गंभीर नियमभंग असून असे आढळल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ नुसार कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा अपर तहसिलदारांनी दिला आहे.
दरम्यान, ई-हक्क प्रणालीतील नोंदी आणि प्रत्यक्ष कार्यालयीन नोंदींमध्ये मोठी तफावत आढळल्याने प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे. सर्व अर्ज केवळ ऑनलाइन स्वीकारण्याचे आदेश असतानाही काही कार्यालयांनी नियमबाह्य पद्धती अवलंबल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई प्रस्तावित केली जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.
नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक महसूल कार्यालयात ‘फिरती दौरे’ बोर्ड लावणे बंधनकारक असून, बोर्ड न लावणाऱ्या कार्यालयांना तत्काळ निर्देश देण्यात आले आहेत.
अपर तहसिलदार कोलते-पाटील यांच्या कडक सुचनांमुळे महसूल विभागात शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदारी वाढण्याची अपेक्षा असून आगामी काळात प्रत्यक्ष कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
