पुणे : येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय (संचलित : महात्मा गांधी सर्वोदय संघ) येथे विद्यार्थी विकास मंडळ, मराठी विभाग व इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुरस्कृत संभाषण कौशल्य कार्यशाळा उत्साहात पार पडली. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आले. व्यासपीठावर मांडवगण फराटा येथील वसंतराव फराटे पाटील महाविद्यालय येथील प्रा. विकास धुमाळ, कला विभागप्रमुख डॉ. समीर आबनावे, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे समन्वयक डॉ. निलेश शितोळे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अमोल बोत्रे आदी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. बोऱ्हाडे म्हणाले, “ज्ञान, बुद्धिमत्ता आणि कष्ट यांना जितके महत्त्व आहे, त्यापेक्षा अधिक महत्त्व प्रभावी संवादकौशल्याला आहे. व्यक्ती काय विचार करते यापेक्षा ती आपले विचार कसे मांडते, यावर तिच्या यशाचे मोल ठरते.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अमोल बोत्रे यांनी केले. त्यांनी कार्यशाळेचा उद्देश व विद्यार्थी विकास मंडळाची भूमिका स्पष्ट केली. दुसऱ्या सत्रात प्रा. विकास धुमाळ यांनी संभाषण म्हणजे केवळ बोलणे नसून ऐकणे, समजून घेणे, योग्य प्रतिसाद देणे आणि विश्वासाचे नाते निर्माण करणे ही एक संपूर्ण प्रक्रिया असल्याचे सांगितले. प्रभावी संभाषणासाठी दर्जेदार वाचन आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
तिसऱ्या सत्रात डॉ. निलेश शितोळे यांनी शाब्दिक व अशाब्दिक संभाषण, तसेच संवादातील आचारसंहितेबाबत मार्गदर्शन केले. संवादकौशल्य जन्मजात नसून सरावाने विकसित होते. नियमित वाचन, चर्चांमध्ये सहभाग आणि आत्मपरीक्षण यामुळे व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडतो, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्वाती शिंदे हिने केले, तर आभार प्रा. भाऊसाहेब तोरवे यांनी मानले. कार्यशाळेत ९७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.