पुणे: लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीत शिकणाऱ्या अनुष्का पाटोळे या विद्यार्थिनीचा वस्तीगृहात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर असून, या प्रकरणात घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यूमागील सर्व दोषींवर कठोरात कठोर कारवाई करून अनुष्का पाटोळे व तिच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावा, अशी ठाम मागणी डॉ. अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तीव्र निषेध नोंदविण्यात आला. या प्रकरणाची वेगाने व सखोल चौकशी करून मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सर्व संबंधित कर्मचारी व दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
सरकार व गृहमंत्रालयाने या प्रकरणात ठोस आणि निर्णायक कारवाई न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हे निवेदन डॉ. अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेचे पश्चिम विभाग अध्यक्ष राजाभाऊ आडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्षा रुपाली आधारे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी पश्चिम विभाग महिला अध्यक्ष उषा खिल्लारे, पश्चिम विभाग उपाध्यक्ष आशा पवार, पुणे जिल्हाध्यक्ष विलास झोंबाडे, पुणे जिल्हा युवा अध्यक्ष अनिल कांबळे, महिला आघाडी सचिव संगीता पारधे, युवती अध्यक्ष नीता पवार, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अनिल कांबळे, पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष संगीता पारधे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते राजू मामा साळवे, किरण अस्वरे, विजू आप्पा पवार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *