पुणे : आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील उद्योजक व व्यवसायिकांना त्वरित आवश्यक उत्पन्न व जात प्रमाणपत्र देऊन कर्जाचे वाटप करण्यात यावे, अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध मराठे यांनी केली आहे. अन्यथा महामंडळ व संबंधित शासकीय यंत्रणांविरोधात कडक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मराठा समाजातील अनेक तरुण व छोटे उद्योजक उद्योग व व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असतानाही प्रमाणपत्रे मिळण्यात होणारा विलंब तसेच कर्ज प्रस्ताव प्रलंबित राहिल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने जाहीर केलेल्या विविध योजनांचा लाभ वेळेत न मिळाल्याने समाजातील युवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असल्याचे मराठे यांनी सांगितले.
आण्णासाहेब पाटील विकास महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या कर्ज योजनांबाबत अनेक अर्ज महिनोन्महिने प्रलंबित असून, कार्यालयीन दिरंगाई, कागदपत्रांची अनावश्यक मागणी तसेच स्पष्ट मार्गदर्शनाच्या अभावामुळे लाभार्थ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. हे प्रकार तत्काळ थांबवून पारदर्शक व जलद कार्यपद्धती राबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जर लवकरात लवकर प्रमाणपत्रे व कर्ज वाटप सुरू झाले नाही, तर मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन, रास्ता रोको तसेच संबंधित कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अनिरुद्ध मराठे यांनी दिला.
या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते म्हणून श्री सचिन नाना सुंबे, श्री भाऊसाहेब महाडिक, श्री सचिन माथेफोड, श्री चंद्रकांत काका दुंडे, श्री सुभाष तात्या कड, श्री दीपक गोते पाटील (अ. भा. म. जिल्हाप्रमुख युवक), श्री गजानन भाऊ जगताप (अ. भा. म. हवेली तालुका संपर्क प्रमुख), अनिरुद्ध मराठे (अ. भा. म. उपाध्यक्ष, हवेली तालुका), श्री भाऊसाहेब जाधव (अ. भा. म. सरचिटणीस) व आकाश गोते पाटील उपस्थित होते.
