पुणे : वाघोली येथे आयोजित करण्यात येत असलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी २०२५-२६ कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आबा काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बारामती येथील सहयोग निवासस्थानी भेट घेतली.

१८ मार्च रोजी वाघोली येथे पार पडणाऱ्या या प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याबाबत त्यांना निमंत्रण देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानच्या प्रतिनिधींनी स्पर्धेची माहिती देत महाराष्ट्रातील कुस्ती परंपरेचा वारसा जपण्याच्या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले.

या प्रसंगी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मानाची समजली जाणारी गदा याची पूजा करण्यात आली. कुस्ती परंपरेचे प्रतीक मानली जाणारी ही गदा महाराष्ट्रातील मल्लविद्येच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देणारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी त्यांनी आयोजकांना शुभेच्छा देत महाराष्ट्रातील समृद्ध आणि वैभवशाली कुस्ती परंपरेला सदैव प्रोत्साहन देण्याची भावना व्यक्त केली. ग्रामीण भागातील तरुणांना कुस्तीच्या माध्यमातून उत्तम संधी उपलब्ध होत असून अशा स्पर्धांमुळे नवोदित मल्लांना मोठे व्यासपीठ मिळते, असेही त्यांनी नमूद केले.