पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात, विशेषतः पुरंदर व लगतच्या तालुक्यांमध्ये दर्जेदार आणि दीर्घकालीन विकासकामांचे जाळे उभारण्यात आले असून, त्यामुळे या भागाच्या विकासाला योग्य दिशा मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
या पार्श्वभूमीवर पुरंदरवासीयांच्या वतीने राज्य सरकार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानण्यात आले.
गोकुळ दहीहंडी उत्सव समितीचे आनंद संजय जगताप आणि केपी फाउंडेशनचे अभिषेक राजमाने यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर, पुणे येथे विशेष आभार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिषदेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या योजना योग्य नियोजनासह आणि वेगाने राबविल्याबद्दल पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री. राहणे यांचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले दक्षिण विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. बाविस्कर आणि कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारी यांचेही आभार मानण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला.
गेल्या २५ वर्षांपासून रखडलेली अनेक विकासकामे मागील दोन-तीन वर्षांत गतीने पूर्णत्वाकडे जात असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. पुरंदर विमानतळाचे काम लवकरच सुरू होणार असून, पुरंदरसह भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दर्जेदार रस्त्यांचे विस्तृत जाळे उभारण्यात आले आहे. त्यामुळे या भागाच्या सामाजिक व आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
पुण्यात आयोजित आंतरराष्ट्रीय सायक्लोथॉन स्पर्धेसाठी विकसित करण्यात आलेल्या सायकल ट्रॅकमुळे स्थानिक नागरिकांनाही दीर्घकालीन लाभ होणार असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार विजय शिवतारे, माजी आमदार ज्येष्ठ नेते संजय जगताप यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार यांचेही तालुक्यातील नागरिकांच्या वतीने आभार मानण्यात आले.
