पुणे : पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्स ६ वी मैदानी क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये उरुळी कांचन (ता. हवेली) येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय लक्ष्मण मदने यांनी ४०० मीटर हार्डल्स प्रकारात ब्राँझ पदकाची कमाई केली आहे.
पिंपरी-चिंचवड येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणी नगर, भोसरी येथे १३ व १४ डिसेंबर २०२५ रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इनोसन्ट टाईम्स स्कूल, पुणे येथील क्रीडा शिक्षक असलेले आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने यांनी सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी केली.
स्पर्धेदरम्यान महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्स असोसिएशनचे सचिव बाळासाहेब चव्हाण व आंतरराष्ट्रीय खेळाडू कैतानो डी’सिल्वा यांच्या हस्ते धनंजय मदने यांचा ब्राँझ पदकाने सन्मान करण्यात आला.
या स्पर्धेत ४०० मीटर हार्डल्समध्ये यशाचे सातत्य कायम राखत धनंजय मदने यांनी पुणे जिल्हा संघाचे कर्णधार म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा संघाने अजिंक्यपद पटकावले.
दरम्यान, नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघामध्ये धनंजय मदने यांची निवड झाली आहे. याबद्दल शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे तसेच इनोसन्ट टाईम्स स्कूलच्या संस्थापक अध्यक्ष अंकिता संघवी यांनी त्यांचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
