पुणे : डायग्नोस्टिक क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी हे आरोग्य व्यवस्थेचे अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र असून अचूक निदानावरच प्रभावी उपचार अवलंबून असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ सैद्धांतिक ज्ञानावर न थांबता प्रयोगशाळा कौशल्ये, शिस्त व व्यावसायिक नैतिकता आत्मसात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन के. पी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. कृपाल पलुसकर यांनी केले.

उरुळी कांचन (ता. हवेली)
महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित डायग्नोस्टिक क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी व मशरूम कल्टिवेशन या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे होते.

यावेळी व्यासपीठावर के. पी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या प्राचार्या सौ. कोमल पलुसकर, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे समन्वयक डॉ. निलेश शितोळे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. अनुजा झाटे उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

डॉ. पलुसकर पुढे म्हणाले की बदलत्या आरोग्य क्षेत्रात पॅरामेडिकल शिक्षणाला मोठ्या प्रमाणात संधी असून महाविद्यालयाने सुरू केलेले हे कौशल्याधिष्ठित प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांनी सांगितले की आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी शिक्षण पुरेसे नसून व्यावहारिक कौशल्ये अत्यावश्यक आहेत. या अभ्यासक्रमांमुळे आरोग्य व प्रयोगशाळा क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी निर्माण होऊन स्वयंरोजगार व उद्योजकतेला चालना मिळेल. महात्मा गांधीजींच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी महाविद्यालयाच्या सामाजिक दायित्वावरही भर दिला. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मशरूम उत्पादन हा कमी भांडवलातील, शाश्वत व उत्पन्न देणारा व्यवसाय असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. अनुजा झाटे यांनी अभ्यासक्रमांचे स्वरूप, उद्दिष्टे व भविष्यातील संधी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी पुणे येथील डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये झालेल्या कला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल स्नेह सूर्यवंशी या विद्यार्थिनीचा विशेष सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन प्रा. स्वाती मासळकर यांनी केले तर आभार प्रा. वृषाली महाडिक यांनी मानले. कार्यक्रमास प्रयोगशाळा कर्मचारी विशालदीप महाडिक, सीमा विसनगरकर तसेच सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे प्राचार्यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *