उरुळी कांचन : पूर्व हवेलीतील उरुळी कांचन येथे बुधवार, दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कामगार आघाडीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष व श्री. काळभैरवनाथ सेवा समितीचे सदस्य गणेश अनिवार कांबळे तसेच समाजसेविका व पंचायत समिती गणाच्या इच्छुक उमेदवार कोमल गणेश कांबळे यांच्या पुढाकाराने संविधान जनजागरण अभियान राबवण्यात आले.
या अभियानांतर्गत ग्रामपंचायत उरुळी कांचन, तलाठी कार्यालय, मंडल अधिकारी कार्यालय, महात्मा गांधी विद्यालय, उरुळी कांचन पोलीस स्टेशन, वीज वितरण विभाग, ग्रामीण रुग्णालय, पद्मश्री मणिभाई देसाई ज्युनिअर कॉलेज, जिल्हा परिषद शाळा (तुपे वस्ती) तसेच इतर प्रशासकीय स्तरावरील कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना भारतीय संविधानाचे ग्रंथ वाटप करण्यात आले.
“महिला, युवक, विद्यार्थी, कामगार आणि विविध दुर्बल घटकांतील जनतेमध्ये संविधान जनजागृती वाढावी, यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा,” असे मत कोमल कांबळे यांनी यावेळी व्यक्त केले. अशाप्रकारे संविधान मूल्यांची जाणीव समाजात रुजवण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरल्याचे स्थानिकांमधून समाधान व्यक्त झाले.
