पुणे : उरुळी कांचन परिसरात एका डॉक्टरचे अपहरण करून तब्बल १९ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा व उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या पथकांनी अवघ्या ४८ तासांत अटक करत मोठी कामगिरी बजावली आहे. या कारवाईत चार आरोपींना जेरबंद करण्यात आले असून खंडणीची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण १५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याप्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ०९/२०२६ अन्वये बी.एन.एस. कलम १४०(२), १४०(३), १२६(२), १२७(२), ११५(२), ११७(२), ३५१(३), ३०८(२), ३०८(३), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी विठ्ठल किसन चौधरी (वय ५८, व्यवसाय डॉक्टर, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) हे १० जानेवारी २०२६ रोजी रात्री सोलापूर–पुणे महामार्गाने उरुळी कांचनहून कुंजीरवाडी येथे कारने जात असताना इनामदार वस्ती परिसरात एका पांढऱ्या रंगाच्या इरटीगा कारने त्यांचा रस्ता अडविण्यात आला. चार अनोळखी व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने डॉक्टरांचे अपहरण केले व त्यांना शिंदवणे परिसराकडे नेले.
आरोपींनी डॉक्टरांना मारहाण करून सुरुवातीला ४ लाख रुपयांची खंडणी घेतली व चौफुला येथे सोडून दिले. त्यानंतर आणखी १५ लाख रुपयांची मागणी करत पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
भीतीपोटी डॉक्टरांनी १२ जानेवारी २०२६ रोजी उर्वरित रक्कम दिली. अशा प्रकारे एकूण १९ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल (पुणे ग्रामीण) यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले.

स्थानिक गुन्हे शाखा व उरुळी कांचन पोलिस स्टेशनची स्वतंत्र पथके तयार करून समांतर तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान संशयाची सुई थेट डॉक्टरांच्या चालकावर गेली. चौकशीत चालक राजेंद्र छगन राजगुरु (वय ३२) याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला.
त्यानंतर त्याच्या कबुली व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संतोष सोमनाथ बनकर (वय ३६), दत्ता ऊर्फ गोटू बाळू आहेर (वय ३४) आणि सुनील ऊर्फ सोनू मुरलीधर मगर (वय ३०, सर्व रा. छत्रपती संभाजीनगर जिल्हा) यांना अटक करण्यात आली.

आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची इरटीगा कार (अंदाजे किंमत ८ लाख रुपये) तसेच खंडणीची रक्कम ७ लाख ८० हजार रुपये असा एकूण १५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता २० जानेवारी २०२६ पर्यंत पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. आरोपी सुनील मगर याच्यावर यापूर्वी मालमत्ता चोरीचे तीन गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार (बारामती विभाग) आणि उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस (दौंड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा पोलिस उपनिरीक्षक अमित सिदपाटील, पोलिस अंमलदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, आसिफ शेख, राजू मोमीण, योगेश नागरगोजे, धिरज जाधव, अजित काळे, प्रविण चौधर, सचिन जगताप, निलेश जाधव, प्रशांत पवार, विशाल रासकर, सुमित वाघ, दिपक यादव, अमोल राऊत यांनी केली केली.