पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागाच्या शैक्षणिक मार्गदर्शनाखाली पद्मपाणी फाऊंडेशन आणि अभिजात भाषा संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २२ मार्च रोजी पुण्यात ‘अखिल भारतीय पाली साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी बनारस हिंदू विद्यापीठातील पाली व बौद्ध अध्ययन विभागाचे माजी विभागप्रमुख आणि ज्येष्ठ पाली अभ्यासक प्रा. डॉ. बिमलेंद्र कुमार यांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीची घोषणा संमेलनाचे मुख्य आयोजक राहुल डंबाळे, पाली व बौद्ध अध्ययन विभागाचे प्रमुख डॉ. महेश देवकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. सिद्धार्थ धेंडे, सहस्वागताध्यक्ष डॉ. गौतम चाबुकस्वार तसेच पद्मपाणी फाऊंडेशनच्या संचालिका सुवर्णा डंबाळे यांनी संयुक्तपणे केली.

प्रा. डॉ. बिमलेंद्र कुमार हे पाली भाषा आणि बौद्ध तत्त्वज्ञान क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभ्यासक मानले जातात. त्यांच्या निवडीमुळे संमेलनाला वैचारिक आणि शैक्षणिक उंची लाभणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
डॉ. कुमार यांनी पाली भाषेतील ‘अभिधम्म’ तत्त्वज्ञानासह ‘धम्मसंगणी’ आणि ‘भेषज्जमंजूषा’ यांसारख्या महत्त्वपूर्ण ग्रंथांवर सखोल संशोधन केले आहे. त्यांनी आतापर्यंत १९ हून अधिक ग्रंथांचे संपादन केले असून विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे १२५ हून अधिक संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३५ हून अधिक विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.
बनारस हिंदू विद्यापीठात पाली विभागप्रमुख म्हणून त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावली आहे. याशिवाय दिल्ली विद्यापीठ आणि विश्वभारती विद्यापीठ (शांतीनिकेतन) येथेही त्यांनी अध्यापन केले आहे. अलीकडेच नेपाळमधील लुम्बिनी बौद्ध विद्यापीठात ‘ICCR डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअर’चे पहिले प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
पाली साहित्याचा प्रचार-प्रसार, संवर्धन आणि संशोधनाला चालना देणे हा या संमेलनामागील मुख्य उद्देश असून देशभरातील पाली भाषा अभ्यासक, संशोधक आणि साहित्यिक मोठ्या संख्येने या संमेलनासाठी पुण्यात सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.