पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीतील भारत मंडपम येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय विचार मंचतर्फे बारावे राष्ट्रीय अधिवेशन व हिंदू रत्न पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात उरुळी कांचन येथील समाजसेवक, प्रवचनकार व दिव्यांग सेवक डॉ. रवींद्र भोळे यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘हिंदू रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्मृतिचिन्ह, शाल, मुद्रा, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ. भोळे हे मागील ३५ वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय, अध्यात्मिक, शैक्षणिक व पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. मराठवाडा भूकंप, कोरोना पँडेमिक, पूरग्रस्त मदतकार्य आदी संकट काळात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. मॅगसेसे पुरस्कार विजेते पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई यांच्या कार्यप्रेरणेने त्यांनी मानवसेवा ट्रस्टची स्थापना करून अनेक सामाजिक उपक्रम राबवले. तसेच ‘डॉ. रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्रा’तर्फे अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जात असून प्रवचनाद्वारे समाजप्रबोधन आणि व्यसनमुक्तीचे कार्यही ते सातत्याने करीत आहेत.
हा पुरस्कार महंत परमहंस श्री 108 डॉ. सदानंद जी महाराज, संत मधुकर रामायण वीरेंद्र जी, अयोध्या हनुमान गडीचे महंत विश्वनाथ जी व राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार सरावगी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. पुणे–दिघी येथील अमोल पाटील यांनाही धार्मिक कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान ‘हिंदू रथ राष्ट्र निर्माण अधिवेशन’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी भारतीय मुद्रेवर प्रभू श्रीराम, गोमाता यांची मुद्रा अंकित करण्याबाबत, गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्याबाबत व हिंदूराष्ट्राच्या मागणीसंदर्भात प्रस्ताव पारित करण्यात आले. अधिवेशनात देशभरातील तसेच आंतरराष्ट्रीय मान्यवरांची उपस्थिती लाभली. विविध प्रदेशाध्यक्षांसह महामंत्री राहुल गोयल यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
