पुणे ,: इयत्ता बारावीच्या अत्यंत महत्त्वाच्या बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या दिवशी केवळ फी न भरल्याच्या कारणावरून चार विद्यार्थ्यांना परीक्षेत बसू न देण्यात आल्याची धक्कादायक घटना एंजल हायस्कूल, कदमवाकवस्ती येथे घडली.

राजवीर बाजीराव सायकर, हिमेश सतीश आटोले, शिवतेज निलेश काळभोर व जान्हवी योगेश महाजन हे विद्यार्थी आज प्रात्यक्षिक परीक्षेसाठी उपस्थित असतानाही, संस्थेतील खुशबू सिंग व नंदा मॅडम यांनी त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवले.
विशेष म्हणजे, फी भरण्यासाठी वेळ देण्याची विनंती करण्यात आली होती. काही पालकांनी चेकद्वारे फी भरण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र, तरीही विद्यार्थ्यांना परीक्षेत बसू दिले गेले नाही. इतकेच नव्हे तर सकाळी ९ वाजता शाळेत बोलावून घेऊन, सकाळी ११ वाजेपर्यंत कोणतेही ठोस कारण न देता विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरातच थांबवून ठेवण्यात आले. हा प्रकार विद्यार्थ्यांना जणू डांबून ठेवल्यासारखा असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.

या घटनेमुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास, अपमान व भीतीचा सामना करावा लागला. फी संदर्भात अडचण असल्यास पालकांना थेट बोलावणे हे योग्य व कायदेशीर असताना, विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेपासून रोखणे व तासन्तास थांबवून ठेवणे हा प्रकार अत्यंत निंदनीय, अमानवी आणि शिक्षण व्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे.

या कृतीमुळे विद्यार्थ्यांचे मूलभूत शैक्षणिक अधिकार हिरावले गेले असून, त्यांच्या करिअर व भवितव्याशी गंभीर खेळ करण्यात आल्याचा आरोप पालकांकडून होत आहे. संबंधित शिक्षक व संस्थेने आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचेही सांगितले जात आहे.
या घटनेची तत्काळ गंभीर दखल घेऊन संबंधित व्यक्तींविरुद्ध चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस आदेश द्यावेत, अशी मागणी पालक व नागरिकांच्या वतीने शिवसेना (शिंदे गट) वतीने नीलेश काळभोर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *